मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये चिखलात भरतो आठवडी बाजार!
मुरबाड दि. 31(सुभाष जाधव ) मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी नावाजलेली असुन, उत्पन्नाचे साधन सुद्धा मोठया प्रमाणात असुन, अनेक बाजार समितीचे गाळे भाड्याने आहेत, नवीन सुद्धा गाळी तयार होत असुन,ती तयार होण्याआगोदर विकली असल्याची चर्चा आहे.
बाजार समितीचे मैदान मोठ आहे, फार मोठया प्रमाणात या बाजार समितीत शुक्रवारचा आठवडी बाजार भरतो. तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व घाट माथ्यावरून शेतकरी आपला माल येथे विक्रीसाठी आणतात. शुक्रवारी एम. आय. डी. सी. कामगारांना सुट्टी असल्याने तसेच पुढचे दोन शनिवार, रविवार असे सुट्टीचे वार असल्यामुळे मुरबाड मधील कामगारवर्ग, व सरकारी कर्मचारी, बाजारहट करणारे नागरिक मोठया प्रमाणात खरेदीसाठी येत असतात.मात्र त्यांना चिखलात, घाणीत, बाजार करावा लागत आहे.
जे दुकानें लावतात त्यांना अक्षरशः चिखलावार, घाणीत दुकान लावावे लागत आहे.सध्या या ठिकाणी चिखल, त्यात कुजलेला भाजीपाला यामुळे उग्र वास येत असुन त्या स्तिथीत बाजार करावा लागत आहे. जे दुकानदार दुकानें लावतात त्यांच्या कडून बाजार समिती आणि नगरपंचायत कर वसुली करते,मात्र या कराच्या बदल्यात दुकानदाराना, व्यवसायिकाना कोणत्याही सोयी सुविधा पुरवल्या जात नाहीत.
कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नगरपंचायत प्रशासन केवळ कर गोळा करण्यासाठीच आहे का, असा सवाल व्यापारी, व्यवसायिक व छोटे दुकानदार करत आहेत.
सध्या कृषी उत्पन्न बाजारसमितीत सत्ताबदल झाला आहे, मात्र बदललेली सत्ता बाजार समितीची झालेली वाताहत बदलेल काय, हे ही आता मुरबाडकराना पाहावे लागणार आहे.